


मुंबई, 21 जुलै (हिं.स.)। देशातील विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने फिनएक्सने फ्रँकलिन टेम्पलटन नॅशनल म्युच्युअल फंड ऑलिम्पियाड २०२६च्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली आहे. देशभरातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून यंदा एक हजारांहून अधिक महाविद्यालयांमधील ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील प्रमुख गुंतवणूक व्यासपीठ ग्रो या उपक्रमाचे शिक्षण भागीदार असून बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाचाही या उपक्रमाला पाठिंबा आहे.
सेबीच्या २०२५ मधील गुंतवणूकदार सर्वेक्षणानुसार देशातील ६६ टक्के जनरेशन झेड तरुणांना किमान एका बाजाराशी संबंधित गुंतवणूक उत्पादनाची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारांची समज देण्यासाठी ऑलिम्पियाडमध्ये म्युच्युअल फंड, ईटीएफ, पीएमएस, एआयएफ आणि एसआयएफ यांसारख्या विविध गुंतवणूक साधनांची ओळख करून दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, बाजारातील संकल्पना आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीबाबत व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होईल.
फ्रँकलिन टेम्पलटन ॲसेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर यांनी सांगितले की, पहिल्या हंगामाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा तरुणांमध्ये आर्थिक शिक्षणाबद्दल वाढत्या उत्सुकतेचा पुरावा आहे. आर्थिक साक्षरता हे महत्त्वाचे जीवनकौशल्य असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य आर्थिक निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
फिनएक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू व्यापक यांनी सांगितले की, ऑलिम्पियाड हे शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांना जोडणारे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. विद्यार्थ्यांना गुंतवणूक आणि वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाची व्यावहारिक समज देण्याबरोबरच अधिकाधिक महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट यंदाच्या हंगामात ठेवण्यात आले आहे.
ग्रोचे सहसंस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी हर्ष जैन यांनी सांगितले की, भारतात अद्यापही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. गुंतवणुकीची साधने उपलब्ध असली तरी त्याविषयीची समज वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थीदशेतच योग्य आर्थिक शिक्षण मिळाल्यास आयुष्यभर चांगल्या गुंतवणुकीच्या सवयी विकसित होतात, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या हंगामात ४०० हून अधिक महाविद्यालयांतील १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्या यशाच्या बळावर यंदाचा हंगाम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला असून अधिकृत व्यासपीठावर नोंदणी सुरू झाली आहे. सहभागी महाविद्यालयांना विनामूल्य नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सजग आणि भविष्याभिमुख विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule