
नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.)। उत्पादन क्षेत्रातील कंपनी मेटालिक टेक्नोफोर्जचा ४९.९६ कोटी रुपयांचा आयपीओ आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना २३ जुलैपर्यंत बोली लावता येणार आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर २४ जुलै रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल, तर २७ जुलै रोजी वाटप झालेले शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. कंपनीचे शेअर्स २८ जुलै रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत होण्याची शक्यता आहे. आयपीओच्या पहिल्या दिवशी सकाळी ११.३० वाजेपर्यंत या इश्यूला १६ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले होते.
मेटालिक टेक्नोफोर्जच्या आयपीओसाठी प्रति शेअर ७२ रुपये ते ७७ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. या इश्यूचा लॉट साइज १,६०० शेअर्सचा आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान दोन लॉटसाठी अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी ३,२०० शेअर्स खरेदी करण्यासाठी २ लाख ४६ हजार ४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओअंतर्गत १० रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण ६४.८८ लाख नवीन शेअर्स जारी केले जात आहेत.
या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) ४७.३५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३३.२९ टक्के आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआय) १४.३० टक्के हिस्सा राखीव आहे. तसेच बाजार निर्मात्यासाठी ५.०६ टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून स्मार्ट हॉरिजन कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.
कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकल्यास मेटालिक टेक्नोफोर्जची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत मजबूत झाल्याचे दिसून येते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ४.२६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. त्यानंतर २०२४-२५ मध्ये हा नफा वाढून ९.०३ कोटी रुपये झाला, तर २०२५-२६ मध्ये कंपनीने १२.३६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला.
कंपनीच्या महसुलातही सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचा महसूल ५१.५० कोटी रुपये होता, जो २०२४-२५ मध्ये वाढून ७५.६४ कोटी रुपये झाला. त्यानंतर २०२५-२६ मध्ये कंपनीचा महसूल ९७.९८ कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र, याच काळात कंपनीवरील कर्जाचा भारही वाढला आहे. २०२३-२४ मध्ये कंपनीवर १०.८१ कोटी रुपयांचे कर्ज होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून ३१.७८ कोटी रुपये झाले.
कंपनीच्या निव्वळ संपत्तीतही वाढ झाली असून २०२३-२४ मधील ७.७२ कोटी रुपयांवरून ती २०२५-२६ मध्ये ३३.४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच कंपनीचा ईबीआयटीडीए म्हणजे व्याज, कर, घसारा आणि अमॉर्टायझेशनपूर्व उत्पन्न २०२३-२४ मध्ये ७.२९ कोटी रुपये होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून २१.९५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या वाढत्या नफा आणि महसुलामुळे या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule