
मुंबई, 21 जुलै (हिं.स.)। एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजारावर दबाव निर्माण झाला. दिवसभर चढ-उतार सुरू असतानाही विक्रीचा प्रभाव कायम राहिल्याने बीएसईचा सेन्सेक्स आणि एनएसईचा निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. मात्र, दुसरीकडे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात तब्बल २.०९ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.
दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ५८.८९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७७,६४९.६३ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या काही मिनिटांत खरेदीचा जोर वाढल्याने निर्देशांक ७७,७५३.१८ अंकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर हेवीवेट शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढू लागल्याने बाजारात घसरण सुरू झाली. दुपारी सुमारे एकच्या सुमारास सेन्सेक्स ३७१.१९ अंकांनी घसरून ७७,३३७.३३ अंकांवर आला. नंतर काही प्रमाणात खरेदी वाढल्याने घसरण कमी झाली आणि अखेरीस सेन्सेक्स २३८.४१ अंकांच्या घसरणीसह ७७,४७०.११ अंकांवर बंद झाला.
निफ्टीची सुरुवातही २२.४५ अंकांच्या घसरणीसह २४,२१६.०५ अंकांवर झाली. सुरुवातीला निर्देशांक २४,२६२.२० अंकांपर्यंत पोहोचला, मात्र त्यानंतर बँकिंग आणि इतर मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीमुळे निफ्टीवर दबाव वाढला. दुपारी तो २४,१३५.६५ अंकांपर्यंत घसरला. दिवसअखेर काही प्रमाणात सावरत निफ्टी ५०.८० अंकांच्या घसरणीसह २४,१८७.७० अंकांवर बंद झाला.
दिवसभराच्या व्यवहारात आयटी, बँकिंग, ऑइल अँड गॅस आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचे वर्चस्व राहिले. त्याउलट पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस, रिअल्टी, मेटल, हेल्थकेअर, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. यामुळे निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.३० टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी वधारला.
बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून ४८४.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहाराच्या दिवशी हे मूल्य ४८२.२० लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.०९ लाख कोटी रुपयांची भर पडली.
दिवसभरात बीएसईवर ४,३९९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,१८८ शेअर्स वाढीसह, २,०२१ शेअर्स घसरणीसह, तर १९० शेअर्स कोणताही बदल न होता बंद झाले. एनएसईवर २,९७२ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यापैकी १,५५७ शेअर्स वाढले, तर १,४१५ शेअर्स घसरले. दिवसातील आघाडीच्या वाढणाऱ्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक्नॉलॉजी यांचा समावेश होता. तर एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि टीसीएस हे सर्वाधिक घसरणारे प्रमुख शेअर्स ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule