राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ मध्ये वैकल्पिक विषय रद्द, मुलाखतीचे गुण १७५
मुंबई, 22 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर वगळण्यात आले असून, मुलाखतीचे गुण १७५ निश्
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२७ मध्ये वैकल्पिक विषय रद्द, मुलाखतीचे गुण १७५


मुंबई, 22 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षा पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर वगळण्यात आले असून, मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आले आहेत.

आयोगाच्या २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ पासून भाषा विषयांचे दोन अर्हताकारी पेपर (मराठी व इंग्रजी), निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर असे एकूण सात अनिवार्य पेपर असतील. यापैकी मराठी व इंग्रजी हे दोन्ही भाषा विषयांचे पेपर २५ टक्के गुणांसह केवळ अर्हताकारी स्वरूपाचे असतील.

त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालासाठी निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर, अशा एकूण पाच पेपर्सचे १२५० गुण विचारात घेतले जाणार आहेत.

वैकल्पिक विषय वगळल्यामुळे लेखी परीक्षेचे गुण १२५० इतके निश्चित झाले आहेत. लेखी परीक्षा व मुलाखतीच्या गुणांचे गुणोत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संतुलित राहावे, यासाठी राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ व त्यानंतरच्या परीक्षांसाठी मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

या निर्णयानुसार राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२७ ची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande