
नागपूर, 22 जुलै (हिं.स.) : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), नागपूर महानगरच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कृतीच्या निषेधार्थ बुधवारी चिटणीस पार्क परिसरातील काँग्रेसच्या देवडिया भवनासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेले.
भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये भाजयुमोचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्याचा निषेध केला. या कथित घटनेला त्यांनी राष्ट्रविरोधी कृत्य संबोधले आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी भाजयुमो महानगर अध्यक्ष सचिन करारे यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि नीट परीक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेत असून, संबंधित प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुनर्परीक्षेचा निकालही जाहीर झाला असून, तरीही आंदोलनाच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, देवडिया भवनासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप केला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या आंदोलनात शहर महामंत्री रितेश पांडे, अथर्व त्रिवेदी, ऋषभ अरखेल, प्रदेश सचिव श्रेयस कुंभारे, समन्वयक अनूप सालवे, युवती प्रमुख प्रशंसा भोयर, शंतनू झाडे, ईशान जैन, शशांक समुद्रे, प्रवीण श्रीवास, सन्नी झेंडे, शुभम पाली, गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर, अक्षय शर्मा, हर्षल मलमकर, उदय मिश्रा, निखिल गौलकर, सौरभ शाहू, जय साजवानी यांच्यासह भाजयुमोचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी