अमरावती : ऍग्रीस्टॅक नोंदणी नसल्यास कर्जमाफीस मुकणार
अमरावती, 23 जुलै (हिं.स.) । अमरावती, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने कर्जमाफीसाठी लागू केलेल्या निकषामध्ये बदल केल्यानंत
अॅग्रीस्टॅक नोंदणी नसल्यास कर्जमाफीस मुकणार


अमरावती, 23 जुलै (हिं.स.) । अमरावती, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शासनाने कर्जमाफीसाठी लागू केलेल्या निकषामध्ये बदल केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या २७ हजार ९४९ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. तथापि त्यांना ऍग्रीस्टॅक नोंदणीसह आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे. तर, राष्ट्रीय व खासगी बॅंकांच्या लाभार्थ्यांची संख्या अद्यापही स्पष्ट झालेली नाही. एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली व ३१ मार्च २०२६ अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बॅंकांकडील कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची दोन लाखापर्यंतची रक्कम (मुद्दल व व्याज) माफ करण्यात येणार आहे.

२ जून २०२६ ला कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली असून १५ जुलै २०२६ ला काही निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. काही अटी वगळण्यात आल्या असल्याने या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यात सहकारी बॅंकेसह राष्ट्रीय व खासगी बॅंकांचे २ लाख ३३ हजार ८७२ शेतकरी कर्जदार, या यादीत समाविष्ट होते. त्यापैकी बदललेल्या निकषानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे २७ हजार ९४९ शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र लाभार्थी ठरले आहेत, त्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय व खासगी बॅंकांच्या किती शेतकरी या योजनेंतर्गत पात्र ठरणार आहेत, हे स्पष्ट नसले तरी बदललेल्या निकषांनुसार दीड लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.

विस्तृत यादी अद्याप आली नसल्याने नेमकी आकडेवारी सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच शासनामार्फत जाहीर करण्यात येणार असून ती संबंधित सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या शाखा, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक क्रमांकासह आधार प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्या जाणार आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांनी केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande