यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार 90 टक्के पेरण्या आटोपल्या
यवतमाळ, 23 जुलै (हिं.स.) : खरीप सुरु झाला आणि पाऊस गायबझाला होता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. पण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार आणि ''मुरवता'' पाऊस बरसत आहे. त्यामुळे पेरण्यांनाही वेग आला असून सोमवारपर्यंत ८७ आणि बुधवारपर्यंत ९०
यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार 90 टक्के पेरण्या आटोपल्या


यवतमाळ, 23 जुलै (हिं.स.) : खरीप सुरु झाला आणि पाऊस गायबझाला होता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. पण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार आणि 'मुरवता' पाऊस बरसत आहे. त्यामुळे पेरण्यांनाही वेग आला असून सोमवारपर्यंत ८७ आणि बुधवारपर्यंत ९० टक्केपर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. तर दुसरीकडे, मध्यंतरी पावसाने खंड दिल्यामुळे तसेच बियाणे बोगस निघाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट घोंगावत आहे.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत ३८.२ मिलीमिटर पाऊस बरसल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. प्रत्यक्षात २२ जुलै रोजी दिवसभर पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस तळ ठाकून होता. महत्त्वाचे म्हणजे, हा पाऊस संततधार असला, तरी वादळ वारा नव्हता. हलक्या सरी कोसळाव्या तसा हा पाऊस सतत बरसत होता. त्यामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. जमिनीत मुरवता पाऊस झाल्याने बियाणे वाहून जाण्याचा धोका टळला, रोप स्वरुपातील पीक वाकण्याचाही धोका टळला. उशिरा का होईना, पण पिकांसाठी पोषण स्वरुपात पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, यवतमाळ जिल्ह्यात खरीप लागवडीचे सरासरी क्षेत्र हे ८ लाख ९९ हजार ९४७हेक्टरी इतके प्रचंड मोठे आहे.यंदा जूनमध्ये पावसाने दगा दिला. तर जुलैमध्येही १५ दिवसांचा खंड दिला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. पण आता २० जुलै रोजीच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. म्हणजेच, ७ लाख ८६ हजार ८४६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर २१ आणि २२ जुलै असे दोन्ही दिवस रिमझीम स्वरुपात पण संततधार पाऊस कायम राहिल्याने या पेरण्यांची टक्केवारी ९० टक्क्यांपर्यंत गेल्याची शक्यता आहे.

आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक पेरणीक्षेत्र कापसाचे आहे. ४ लाख ५५ हजार १७३ हेक्टरवर कापसाची लागवड आटोपली आहे. सोयाबीन २ लाख २८ हजार हेक्टरवर, तर तुरीची पेरणी ९७ हजार ७५४ हेक्टरवर झाली आहे. ज्वारी, मक्याची पेरणी अत्यल्प झाली आहे. मूग, उडीदाचा पेरा १६०० हेक्टरवर पोहोचला आहे. तालुकानिहाय बरसलेला पाऊस तालुका मि.मी. यवतमाळ ४०.१ बाभूळगाव १८.९ कळंब २६.३ ४२.८ दारव्हा ३३.७ दिग्रस ३८.८ आर्णी २९.८ नेर २६.२ पुसद ३९.७ उमरखेड ३६.५ महागाव ४२.७ वणी ४४.२ मारेगाव ४३.६ झरी ५९.६ घाटंजी केळापूर ४६.१ राळेगाव ३५.३ एकूण ३८.२ सायखेडा धरण 'ओव्हरफ्लो'च्या उंबरठ्यावर केळापूर तालुक्यातील सायखेडा मध्यम प्रकल्प २२ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता ९४.४० टक्के भरल्याची माहिती केळापूर एसडीओंनी कळविली आहे. तसेच या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस पडल्यास हा प्रकल्प लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.

हा प्रकल्प 'द्वारविरहीत' असल्यामुळे धरण पूर्ण भरल्यानंतर पाणी सांडव्यावरून वाहून खुनी नदीत जाणार आहे. नदीला पूर आल्यास केळापूर तालुक्यातील सायखेडा, लिंगटी, मोरवा, पिंपरी, आकोली, पांढरकवडा, केळापूर, तातापूर, झुंजारपूर, ढोकी, साखरा, बल्लारपूर, वाहा कवठा, पाटणबोरी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande