
यवतमाळ, २३ जुलै (हिं.स.) : झरी जामणी तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील शिक्षण व्यवस्थेची दयनीय स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मार्की (खु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना प्लास्टिक ताडपत्रीच्या तात्पुरत्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे.
या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून एकूण २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत; मात्र विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच वर्गखोली उपलब्ध आहे. मागील वर्षी शासनाच्या निर्लेखन प्रक्रियेत एक जुनी वर्गखोली पाडण्यात आली. त्यानंतर नवीन इमारत बांधण्याची अपेक्षा असताना अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
नवीन इमारत मंजूर झाल्याचे कागदोपत्री सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. उपलब्ध असलेल्या एकमेव खोलीत शालेय साहित्य आणि पोषण आहार ठेवावा लागत असल्याने अध्यापनासाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही.
परिस्थिती पाहता शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत प्लास्टिक ताडपत्रीचे तात्पुरते शेड उभारले आहे. मात्र, पावसाळ्यात या शेडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अत्यंत कठीण होत आहे.
ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत असले तरी शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने तातडीने नवीन शाळा इमारतीचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी