अमरावती-आषाढ सरींमुळे पिकांना पोषक वातावरण, बळीराजाही सुखावला
अमरावती, 23 जुलै (हिं.स.)गेल्या चार दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातील आषाढ सरींनी समाजमन सुखावले असून बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद तरळला आहे. या सरींनी माना टाकणाऱ्या पिकांना संजीवनी देण्यासोबतच जलसाठ्यात अल्पशी वाढ केली आहे. जिल्ह्यात आताप
आषाढ सरींच्या संततधारेने सुखावले समाजमन


अमरावती, 23 जुलै (हिं.स.)गेल्या चार दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातील आषाढ सरींनी समाजमन सुखावले असून बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद तरळला आहे. या सरींनी माना टाकणाऱ्या पिकांना संजीवनी देण्यासोबतच जलसाठ्यात अल्पशी वाढ केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत ६८ टक्के पाऊस झाला आहे.

२५ जुलैपर्यंत पावसाच्या सरी कोसळत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असून रिमझिम पावसात रखडलेल्या पेरण्यांनाही प्रारंभ झाला आहे. यंदा मॉन्सून विलंबाने आल्याने पेरण्या उशिराने झाल्यात. जुलै महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसाने पेरण्यांची गती वाढली व जिल्ह्यात सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्यात. विशेष म्हणजे यातील सहा टक्के पेरण्या गेल्या आठवड्यात झाल्या आहेत. १० जुलैपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेल्या पिकांना धोका निर्माण झाला होता. पाण्याची नितांत गरज असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्यासोबतच यंदाचा खरीप हातचा जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाची सरासरी कमी राहणार असून उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेती तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर पावसाची गैरहजेरी शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरू लागली होती. दरम्यान, १९ जुलैपासून पावसाने किरकोळ स्वरूपात हजेरी लावण्यास सुरवात केली.

रविवारी जिल्ह्यात हलक्या स्वरूपातील पाऊस झाला. त्याची सरासरी अतिशय किरकोळ अशी २.२ मी. मी. इतकी होती. दुसऱ्या दिवशी २० जुलैला २.६ मी. मी. बरसला. मंगळवार (ता. २१) व बुधवारी (ता. २२) मात्र पावसाने गती वाढवत चांगला दिलासा दिला. दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी २७.४ मी. मी. पाऊस झाला. या पावसाने जुलै महिन्यातील अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत सरासरीत वाढ केली आहे. तथापि, तूट भरून निघालेली नाही. एक ते २२ जुलै, या कालावधीत सरासरी ४७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने सलग धार धरल्याने हवामानात बदल झाला असून गारवा आला आहे. यामुळे समाजमन सुखावले असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. पिकांना वाढीच्या काळात पाऊस आल्याने संजीवनी मिळाली आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande