
अमरावती, 23 जुलै (हिं.स.) । गेल्या सात महिन्यात अमरावती शंहरातील भटक्या कुत्र्यांनी तब्बल ७ हजार ५०० जणांना चावा घेतला आहे. यामध्ये ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने काहींवर शस्त्रक्रिया करावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु महापालिकेचे याकडे अजूनही लक्ष गेलेले नाही. त्यामुळे यंत्रणा नागरिकांच्या मृत्यूची प्रतिक्षा करीत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नियंत्रणाअभावी ही संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. २०२३ मध्ये मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.त्यावेळी शहरात २५ हजार मोकाट कुत्रे असल्याचे समोर आले होते. परंतु तीन वर्षापासून शहरातील मोकाट कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही आणि नसबंदी सुध्दा करण्यात आलेली नाही. सद्यःस्थितीत शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ४० ते ४५ हजारांच्या घरात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी मनपाने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचा कंत्राट दिलाहोता. परंतु संबंधित ठेकेदाराने किती कुत्र्यांची नसबंदी केली, याबाबत केवळ कागदोपत्रीच माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. महापालिकेत केवळ ठेकेदारांचे लाखो रुपयांचे देयक अदा करण्याची अधिकाऱ्यांना काळजी असते. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सर्वसामान्य नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी