अमरावती : वरुड पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; स्वच्छता मोहिमेची मागणी
अमरावती, 23 जुलै (हिं.स.)। तालुक्यातील महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या वरुड पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचा अभाव, गळके छत, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि वाढलेल्या झाडाझुडुपांमुळे
वरुड पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य


अमरावती, 23 जुलै (हिं.स.)। तालुक्यातील महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या वरुड पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचा अभाव, गळके छत, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि वाढलेल्या झाडाझुडुपांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या भव्य इमारतीची आजपर्यंत रंगरंगोटी किंवा आवश्यक देखभाल झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कार्यालयातील विविध विभागांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र धूळ व घाण साचलेली आहे. पावसाळ्यात छताला जागोजागी गळती लागल्याने कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. कार्यालयातील स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे तुटलेले किंवा निखळलेले असून स्वच्छतेचा अभाव असल्याने त्यांचा वापर करणेही कठीण झाले आहे.

कार्यालयाच्या बाहेरील आवारात काडीकचऱ्याचे ढिगारे साचले असून झाडेझुडुपे वाढल्याने परिसर विद्रूप झाला आहे. प्रवेशद्वारासमोरही झाडे वाढल्याने परिसराच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. पंचायत समिती कार्यालयात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक विविध शासकीय कामांसाठी येत असतात. त्यामुळे इमारतीची रंगरंगोटी, छताची दुरुस्ती, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती, तसेच परिसरातील कचरा व झाडझुडुपांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच कार्यालयाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

लोणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल मालपे म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने पंचायत समिती कार्यालयात येतात. स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे त्यांची मोठी कुचंबणा होते. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे. अशी परिस्थिती असेल तर शाळांना स्वच्छतेचा संदेश कसा दिला जाईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande