
लातूर, 23 जुलै (हिं.स.) : पुढच्या पिढीला निरोगी, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. केवळ झाडे लावून न थांबता ती जगविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते आज देवर्जन येथील हत्तीबेट ता.उदगीर येथे आयोजीत माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राबवित असलेल्या जनसेवा सप्ताहातील उपक्रमांर्गंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजीत देवगिरी ते देवराई हत्तीबेट येथे ३० हजार वृक्ष लागवडीच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते.
या जनसेवे सप्ताहात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांच्या संकल्पनेतून ३० हजार वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी अहमदपुरच्या वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा नागरगोजे,जि.प.चे गटनेते दिलीप मटके, उमेश उमापुरे, शितल शिंदे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, बाळासाहेब मरलापल्ले, विक्की भोसले, प्रकाश बिरादार, सर्जेराव भांगे, संदिप बिरादार, नगरसेवक शिवकुमार कांबळे, इम्रान सय्यद, व्यंकट बोईनवाड, कमलाकर फुले, फय्याज शेख, अभिजीत साकोळकर, चंद्रकांत कांबळे, बळी सुर्यवंशी, महेश बिरादार, शफी हाशमी, लक्ष्मण बतले, नगरसेविका अॅड.वर्षा कांबळे, ज्योती बानापुरे, सिमा नेत्रगावकर, सुधाकर बिरादार, गजानंद बिरादार, रोहिदास गंभीरे, नामदेव डिगोळे, सुग्रीव सुर्यवंशी, बस्वराज उमाटे, गंगाधर गरीबे, गंगाधर दवणीपुरगे, शुभम भुमणे, संतोष रोडगे, अंतेश्वर रोडगे, राजु कवडे, महानंदा झुकले, राजु हुडगे, नारायण पाटील, राम स्वामी, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, वाढते तापमान, कमी होत चाललेले जंगलाचे क्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास भविष्यातील पिढीला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवेगार वातावरण मिळू शकते. वृक्ष हेच खरे जीवनाचे आधार असून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवडीसह त्यांचे संवर्धनही तितकेच आवश्यक आहे.
या मोहिमेत फळझाडे, औषधी वनस्पती, सावली देणारी तसेच स्थानिक हवामानास अनुरूप विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. लागवडीनंतर नियमित पाणी, संरक्षण आणि देखभाल यासाठी स्वयंसेवकांची समितीही कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.
आ. संजय बनसोडे यांनी सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांना या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीला निरोगी जीवन देईल. त्यामुळे वृक्षलागवड ही केवळ एक मोहीम नसून भविष्यासाठीची गुंतवणूक आहे, असे ते म्हणाले.
३० हजार वृक्षलागवडीच्या या उपक्रमामुळे परिसरात हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरणाचा समतोल राखण्यास आणि पुढील पिढीसाठी अधिक सुरक्षित व निरोगी भवितव्य घडविण्यास निश्चितच मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis