नाशिककरांच्या सुरक्षेसाठी संघाचे स्वयंसेवक मदतीला
नाशिक, 23 जुलै (हिं.स.) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी कोणत्याही क्षणी रौद्ररूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पूर पाहण्यासाठी नदीकाठाव
For the safety of Nashik


नाशिक, 23 जुलै (हिं.स.) : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी कोणत्याही क्षणी रौद्ररूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पूर पाहण्यासाठी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सुरेश आव्हाड यांच्या सूचनेनुसार स्वयंसेवकांनी भरपावसात शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी तैनात राहून नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन केले. पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना धोकादायक ठिकाणांपासून दूर जाण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूल, घारपुरे घाट, सिद्धेश्वर पूल, एकमुखी दत्त मंदिर परिसर, भांडीबाजार आणि दहीपूल या गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवकांनी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य, प्रचारप्रमुख श्रीपाद व्यवहारे, बजरंग दलाचे श्रीकांत क्षत्रिय, विश्व हिंदू परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजेश दरगोडे, अभाविपच्या मेघा शिरगावे, मित ठक्कर आणि संघटनमंत्री गोविंद देशपांडे यांनी विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

गरज भासल्यास आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांची युवा टीम नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहील, असे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात येत आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande