
बीड, 23 जुलै (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित वेतन देयके तातडीने अदा करावीत, या मागणीसाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (PAY UNIT) कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी चाटे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची थकीत देयके त्वरित मंजूर करून अदा करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक, वैद्यकीय प्रतिपूर्ती, रजा कालावधीची देयके, सेवानिवृत्ती लाभ तसेच इतर सर्व प्रलंबित देयकांचा समावेश आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे (मुप्टा) जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे, ज्युनिअर विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण घोलप, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, मुख्याध्यापक डॉ. संजय मुरुमकर तसेच शेख मसरूर अनवर आदी उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित देयकांमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत, संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis