
लातूर, 23 जुलै (हिं.स.) राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३३ शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा, एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भोसले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लातूर जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीत नावे असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत जनजागृती करावी. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्या-टप्प्याने प्रसिद्ध होणार असल्याने प्रत्येक टप्प्यात समाविष्ट नावांची यादी संबंधित बँका, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुका सहायक निबंधक कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्याची कार्यवाही गतीने होईल, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी सोबत आपले आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक, यादीतील विशिष्ट क्रमांक (व्हीके नंबर) आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पुरावा आणणे अनिवार्य आहे, असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. पोतंगले यांनी सांगितले. आधार प्रमाणीकरण प्रक्रियेदरम्यान आधार क्रमांक किंवा कर्जाच्या रक्कमेत काही त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांना पोर्टलवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकास्तरावर संबंधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील पर्जन्यमान, उपलब्ध पाणीसाठ्याबाबत आढावा
पालकमंत्री श्री. भोसले यांनी जिल्ह्यात सद्यस्थितीत झालेले पर्जन्यमान, प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, तसेच जनावरांसाठी उपलब्ध चारा याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. लातूर शहरासाठी डिसेंबरपर्यंत पुरवठा होईल, इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. तसेच ग्रामीण भागातील परिस्थितीवरही प्रशासन लक्ष ठेवून असून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात यत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis