अमरावतीत डेंग्यूचे 113 रूग्ण आढळले
अमरावती, 23 जुलै (हिं.स.) पावसाळ्यातील साथरोगांनी डोके वर काढले असून जिल्ह्यात डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणा कार्यान्वित झाली असून नागरिकांनीही दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले
अमरावतीकरांनो सावधान, डेंग्यू पुन्हा डोके वर काढतेय


अमरावती, 23 जुलै (हिं.स.) पावसाळ्यातील साथरोगांनी डोके वर काढले असून जिल्ह्यात डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणा कार्यान्वित झाली असून नागरिकांनीही दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत डेंगीचे ११३ व चिकुनगुनियाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

डेंग्यू , चिकुनगुनिया व मलेरिया, यासारख्या आजारांचा पावसाळ्यात प्रादुर्भाव वाढतो. हा प्रकोप लक्षात घेत आरोग्ययंत्रणा पावसाळ्यापूर्वीपासूनच जनजागृती करीत नागरिकांना दक्षतेचे आवाहन करते. यंदा जून व जुलैतील पावसाने सलग हजेरी लावलेली नाही. त्यामुळे कायम राहिलेल्या उष्म्यामुळे अनेकांनी कुलर्स काढलेच नाहीत. याशिवाय साचलेले पाण्याचे डबके, फुलदाणी या स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. फवारणी व धुवारणीचेही काम झालेले नाही. परिणामतः डेंगी डासांची उत्पत्ती झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या आजाराचे डास, अशा साठवलेल्या पाण्यात अंडी घालतात व तेथूनच त्यांची मुख्य उत्पत्ती होते, असे आरोग्ययंत्रणेने म्हटले आहे.

दरम्यान, मे ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्यात डेंगीचे ११३ व चिकुनगुनियाचे ४३ रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्ण उपचारानंतर दुरुस्त झाले असले तरी धोका मात्र कायम आहे. मे महिन्यात डेंगीचे ३४ रुग्ण आढळले होते, त्यामध्ये जून व जुलै महिन्यात वाढ झाली. जूनमध्ये ४४ व २० जुलैपर्यंत ३३ डेंगीचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्ययंत्रणेने दिली आहे. त्याचवेळी चिकुनगुनियाचे मेमध्ये १३, जून १६ व २० जुलैपर्यंत १४, असे एकूण ४३ रुग्ण आढळले आहेत. सद्या सर्दी, ताप, घसा दुखणे व खोकल्याच्या रुग्णांसह व्हायरल फिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातील काही रुग्ण डेंगी व चिकुनगुनियाचे असल्याचे तपासणी अहवालात आढळले आहे. आतापर्यंत २१ रुग्ण मलेरियाचे आहेत.

आरोग्य विभागाकडून डेंगी, चिकुनगुनिया व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण, तापग्रस्त रुग्णांची तपासणी, डास अळ्यांचे निर्मूलन व फवारणी, धुवारणीसह जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात आशासेविका व आरोग्य कर्मचारी गृहभेटी देत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत मार्गदर्शन करीत आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande