
बीड, 25 जुलै (हिं.स.)।केज शहरातील जय भवानी चौकात नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात एका तरुण शेतकन्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात हलहळ व्यक्त होत आहे. यापूर्वीही या चौकात अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या चौकाच्या धोकादायक रचनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
खामगाव-पंढरपूर आणि अहिल्यानगर-लातूर या राज्य महामार्गाच्या संगमावर असलेला जय भवानी चौक वाहतुकीसाठी अक्षरशः 'मृत्यूचा सापळा' ठरत होता. चौकाची रचना क्षमतेपेक्षा मोठी असून उपलब्ध जागा कमी असल्याने वाहनचालकांना वळण घेताना अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी वारंवार नागरिकांकडून केली जात होती.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत केज शहरातील हास्य क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. जेसीबीच्या सहाय्याने चौकावरील अतिरिक्त व वाहतुकीस अडथळा ठरणारे बांधकाम हटवून चौक मोकळा करण्यात आला. त्यामुळे वाहनांची ये-जा अधिक सुलभ झाली असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हास्य क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे शहरभरातून स्वागत होत असून, नागरिकांनी सदस्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. तसेच भविष्यात वाहतुकीच्या दृष्टीने आवश्थक त्या उपाययोजना प्रशासनानेही तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis