तुळस डोईवर, सायकल हाती... विठुरायाच्या भक्तीत रंगली ठाण्याची आषाढी सायकलवारी
ठाणे, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! आणि जय जय राम कृष्ण हरी! या नामघोषाने ठाणे आज दुमदुमून गेले. चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट, ठाणे आणि आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आय
*तुळस डोईवर, सायकल हाती... विठुरायाच्या भक्तीत रंगली ठाण्याची आषाढी सायकलवारी*


ठाणे, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल! आणि जय जय राम कृष्ण हरी! या नामघोषाने ठाणे आज दुमदुमून गेले. चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट, ठाणे आणि आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आषाढी सायकलवारीत तब्बल ३५ सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्ती, पर्यावरण आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.

या अभिनव उपक्रमाचा गौरव म्हणून ट्रस्टच्या वतीने आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशनच्या संस्थापक प्रज्ञा म्हात्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा उपक्रम चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट (स्थापना १४६५) आणि श्री आनंद भारती समाज (स्थापना १९१०) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ११६ व्या आषाढी अखंड हरिनाम सप्ताहात साकारला. या सायकलवारीचे नेतृत्व गणेश कोळी, अमोल कुळकर्णी, गुरुप्रसाद देसाई, निखिल शिवलकर, विठ्ठल कांबळे यांनी केले.

सायकलवारीची सुरुवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून झाली. वारकरी भवन येथे पोहोचल्यावर भक्तिमय वातावरणात गोल रिंगण झाले आणि विठुरायाचे दर्शन घेण्यात आले. वारकरी भवनचे सुधीर शेलार यांनी सर्व सायकलप्रेमींचे स्वागत केले. त्यानंतर गजानन महाराज मठात दर्शन घेऊन अष्टविनायक चौकात पुन्हा एकदा रिंगण साकारले.

सायकलवारीचा समारोप चेंदणी कोळीवाड्यातील पुरातन विठ्ठल मंदिरात झाला. ट्रस्टतर्फे सर्व सायकलप्रेमींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सवाद्य पालखी मिरवणूक, भजन, फुगडी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शुभदा कोकीर आणि वैशाली गणेकर यांना श्री विठ्ठल पूजेचा मान मिळाला. पूजेचे पौरोहित्य योगेश पाठक गुरुजी यांनी केले. पालखी सजावटीत योगेश कोळी, मधुकर कोळी, प्रकाश कोळी आणि संजय कोळी यांचे योगदान लाभले. योगेश कोळी व मधुकर कोळी यांनी बँड पथकाचे नेतृत्व केले. शुभांगी भोर यांनी भजन आणि मारुती स्तोत्र सादर केले, तर बँडच्या ठेक्यावर भक्तांची फुगडी रंगली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande