
बीड, 26 जुलै (हिं.स.)।
बसमध्ये झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत वृद्ध महिलेच्या पिशवीतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिला चोरट्याला आष्टी आगाराच्या एका महिला वाहकाने अत्यंत धाडसाने पाठलाग करून रंगेहात पकडले. आष्टी आगाराच्या कडा-मिरजगाव बसमध्ये शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून, आलिशा बागवान असे या जिगरबाज महिला वाहकाचे नाव आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे वृद्ध महिलेचे १ तोळा सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाले आहेत.
मिरजगाव बसस्थानकावरून कड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत एका भामट्या महिलेने पिशवीत दागिने ठेवणाऱ्या एका वृद्ध महिलेवर पाळत ठेवली. संधी मिळताच चोरट्या महिलेने पिशवी हिसकावून घेऊन बसमधून पळ काढला. वृद्ध महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात करताच बसमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला वाहक आलिशा बागवान यांच्या ही बाब तत्काळ लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बसमधून उतरून पळून जाणाऱ्या चोरट्या महिलेचा पाठलाग केला आणि तिला रंगेहात पकडले.
पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये वृद्ध महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे आढळले. बागवान यांनी ते दागिने तत्काळ वृद्ध महिलेच्या हवाली केले. स्वतःचे आयुष्यभराचे पुंजीसारखे असलेले सोने परत मिळाल्याचे पाहून वृद्ध आजीबाई भावुक झाल्या आणि त्यांनी 'पोरी, तू आज माझ्यासाठी साक्षात देवाच्या रूपात धावून आलीस' अशा शब्दांत बागवान यांचे आभार मानले. महिला वाहकाच्या या शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis