
नांदेड, 26 जुलै (हिं.स.)।
व्यापार-उद्योग, वृत्तपत्र वितरण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यासह संघर्षमय वाटचालीची दखल घेत बीड येथील सुदाम चव्हाण यांचा मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या २९ व्या अधिवेशनानिमित्त नांदेड-धर्माबाद येथे आयोजित व्यापारी परिषदेत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. बीड जिल्हा व्यापारी संघटना आणि मराठवाडा विभागीय समितीच्या वतीने त्यांच्या कार्याची नोंद घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
नांदेड-धर्माबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मराठवाडा चेंबर्सचे अध्यक्ष आदेश पाल सिंगजी छाबडा, माजी अध्यक्ष मानसींग पवार, उपाध्यक्ष सुनिल किर्दत, नांदेड जिल्हा व्यापारी अध्यक्ष सुबोध ओमप्रकाश काकांनी आणि विधी तज्ञ सुप्रीम कोर्ट राहुल हिंगमीरे यांच्या हस्ते सुदाम चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बीड जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष अशोक अप्पा शेटे, शहर अध्यक्ष प्रकाश कानगांवकर, सचिव तुकाराम साळुंके आणि मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सत्यनारायन लाहोटी, मोहम्मद लाईक उपस्थिती होती.
शेतमजुराच्या कुटुंबात जन्मलेल्या सुदाम चव्हाण यांना लहान वयातच संघर्षाला सामोरे जावे लागले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई आणि बहिणीची जबाबदारी सांभाळत त्यांनी हमाली, आठवडी बाजारातील कष्ट आणि वस्तूंची विक्री करून शिक्षणाचा खर्च भागवला. १९८६ ते १९८९ या काळात बंकटस्वामी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे अर्थशास्त्र विषयात एम.ए. करण्यासाठी मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला. रात्री दैनिकाच्या पार्सल विभागात काम आणि दिवसा शिक्षण व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असा त्यांचा दिनक्रम होता.
१९८९ मध्ये बीडला परतल्यानंतर संतोष बुक स्टॉलमध्ये वृत्तपत्र वितरणाचे काम सुरू केले. ३ डिसेंबर १९९५ रोजी सुभाष रोडवरील नगरपरिषदेच्या गाळ्यातून लक्ष्मी न्यूजपेपर एजन्सीच्या कामाला सुरुवात केली. या प्रवासात दोन मुली आणि एक मुलगा — कल्याणी, किरण आणि प्रथमेश — हे तिन्ही अपत्ये एमबीबीएस डॉक्टर झाली असून कल्याणी पुढील सुपरस्पेशालिटीचे शिक्षण घेत आहे.
वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ग्रामीण तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नांतून २०० हून अधिक तरुण अधिकारी, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. लक्ष्मी गोविंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रेस कामगारांचा सन्मान, रेनकोट वाटप आणि आरोग्य विमा उपक्रम राबवण्यात आले. आदर्श मार्केट व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून ८० हून अधिक दुकानदारांसाठी स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. संत मुक्ताबाई पालखी आणि रामनवमीच्या सेवाकार्यातही त्यांनी सहभाग घेतला.
बीड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मागील १५ वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या सुदाम चव्हाण यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार तसेच व्हॉइस ऑफ मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षीही ते पहाटे साडेचार वाजता बसस्थानकावर पोहोचून वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचवतात.
व्यापारी परिषदेत व्यापार-उद्योग क्षेत्रासमोरील प्रश्न, अडचणी आणि भविष्यातील वाटचालीवर चर्चा झाली. विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी विकासासाठी आवश्यक उपाययोजना, संघटनात्मक भूमिका आणि परस्पर समन्वयाबाबत विचार मांडले. या पार्श्वभूमीवर सुदाम चव्हाण यांच्या कार्याचा झालेला सन्मान हा बीडच्या व्यापार, उद्योग आणि वृत्तपत्र क्षेत्रासाठी गौरवाचा ठरला.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis