
अमरावती, 26 जुलै (हिं.स.)।
प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला दर्यापूर येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सुमारे ३, ७१४ नागरिकांनी भेट देऊन विविध महसुली सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै रोजी दर्यापूर उपविभागांतर्गत कृषी भवन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभागामार्फत सातबारा, फेरफार, सेतुकेंद्रावरील दाखले, शिधापत्रिका तसेच इतर सेवांसह एकूण १, ४७८ महसुली प्रकरणांचा निपटारा करून लाभार्थ्यांना कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. पंचायत समितीच्या उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दर्यापूर येथील १५ बचतगटांना एक कोटी रुपये, तर अंजनगाव येथील नऊ बचतगटांना ७८ लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. याशिवाय पंचायत समितीमार्फत १६५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागाने ३११ आभा कार्ड व आयुष्मान गोल्डन कार्ड वितरित केले. पशुसंवर्धन विभागाने १२० लाभार्थ्यांना बियाणे व औषधांचे वाटप केले. तालुका क्रीडा विभागाने राष्ट्रीय व राज्यस्तरीय २२ गुणवंत खेळाडूंचा सत्कार केला. भूमी-अभिलेख विभागाने ३५९ मोजणी सनद व मिळकत पत्रिका वितरित केल्या. तसेच बँक, राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, पोलिस व इतर विभागांच्या माध्यमातून विविध सेवा व प्रमाणपत्रे देऊन एकूण ३, ७१४ लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभासी संदेशाद्वारे शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी