
मुद्दल आणि व्याज देऊनही ब्लॅकमेलिंग; नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सावकारांवर गुन्हे दाखल
अमरावती, 26 जुलै (हिं.स.)।
अवैध सावकारीच्या भीषण पाशात अडकून अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील तरोडा येथील पवन भाकरे (४५) या शेतकऱ्याने शेतातील झोपडीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्याजाचे पैसे व मुद्दल पूर्ण परत करूनही जबरदस्तीने लिहून घेतलेली शेती परत न देता कंत्राटदार व एजंट ब्लॉक मेल करत असल्याने या हताश शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
मृत्यूपूर्व चिठ्ठीत आरोपींची नावे समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि शेतकऱ्यांनी ठाण्यात धडक देत मृतदेह उचलण्यास नकार दिला. अखेर दबावानंतर मोर्शी पोलिसांनी कैलास सारडा (रा.चांदूर बाजार) एजंट नवनीत चांडक (रा.चांदूर बाजार) व घनश्याम गट्टानी (रा. मोर्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारीचा मुद्दा ऐरणीवर आलाय.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी