
अमरावती, 26 जुलै (हिं.स.)
पावसाळ्यातील साथरोगांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने व्यापक आरोग्ययंत्रणा लागू करण्यासाठी बैठका घेतल्यात. मात्र या बैठकी केवळ औपचारिकताच ठरल्याचे दिसू लागले असून अजूनही फवारणी व धुवारणीच्या कामास सुरुवात झालेली नाही.
विशेष म्हणजे, यासाठी स्वंतत्र निविदा करण्यात आली असली तरी फवारणीचे काम कोणार्क कंपनीकडूनच करून घ्यावे, असा मतप्रवाह समोर आल्याने फवारणी व धुवारणीचे काम नेमके करावे कुणी? हे स्पष्ट झालेले नाही. सोमवारी यावर आयुक्तांच्या उपस्थितीत पुनर्विचार करण्यात येणार आहे. पावसाळ्यात साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेत महपौर व आयुक्तांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत फवारणी व धुवारणीच्या कामांना तत्काळ प्रारंभ करण्यावर भर देण्यात आला. त्यापूर्वी फवारणी व धुवारणीसाठी स्वतंत्र कंत्राटदार, या कामासाठी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने एक जुलैला ४४.७६ लाख रुपयांची निविदा सादर केली होती. आठ जुलैला आलेल्या निविदा उघडण्यात येणार होत्या, स्पर्धात्मक गुणांकन करून कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार होता. मात्र शहर स्वच्छतेचा कंत्राट देण्यात आलेल्या कोणार्क कंपनीकडूनच हे काम करून घेण्याचा मतप्रवाह समोर आल्याने निविदाप्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. स्वच्छता समितीनेही आपल्या अहवालात तशी शिफारस केली असून आमसभेने त्यास मंजुरी दिली आहे. मात्र कोणार्क कंपनीसोबत शहर स्वच्छतेच्या भाग दोनसाठी झालेल्या करारनाम्यात फवारणी व धुवारणीची अट नसल्याने स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निविदा करण्यात आली. स्वच्छता व फवारणी, यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त केल्याने कामात समन्वयाचा अभाव राहण्याची शक्यता खूद्द आयुक्तांनी वर्तविली असल्याचे सांगण्यात आले. पदाधिकारी व सदस्यांनी कोणार्ककडेच काम देण्यावर भर दिला आहे.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी