
वर्धा, 27 जुलै (हिं.स.) शाळाबाह्य तसेच स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार असून १५ जुलैपासून अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील दुर्गम भाग, वाड्या वस्त्या आणि विविध ठिकाणी जात युद्धपातळीवर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.
जिल्ह्यात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी तसेच मंडळस्तरीय यंत्रणा सर्वेक्षणाच्या कामात सहभागी झाली आहे. यापूर्वी ही मोहीम दिवाळीनंतर राबविली जात होती. त्यावेळी शैक्षणिक सत्राचा मोठा कालावधी उलटून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे यंदापासून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेत पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटसाधन केंद्रातील कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून सर्वेक्षण केले जात आहे. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेतप्रत्येक घर, बसस्थानके, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, भोजनालये, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वीटभट्ट्या, खाणी, कारखाने, बालमजुरीची शक्यता असलेली ठिकाणे, तसेच गावे, वाड्यया-वस्त्या, तांडे आणि जंगलालगतच्या भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात २०२४ मध्ये २९ तर २०२५ मध्ये १० असे एकूण ३९० शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले होते. त्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला होता. ३१ जुलैला सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर या वर्षात किती शाळाबाह्य मुले सापडली याचा आकडा पुढे येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी