माथेरान घाटात थरार! रस्त्यावर कोसळला महाकाय दगड
रायगड, 27 जुलै (हिं.स.)। नेरळ-माथेरान येथे पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरडी व दगड कोसळण्याच्या घटना वाढत असतानाच माथेरान घाट मार्गावर महाकाय दगड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने त्यावेळी मार्गावर वाहनांची किंवा पर्यटकांची
Thrilling moment in Matheran Ghat! Massive boulder crashes onto the road.


रायगड, 27 जुलै (हिं.स.)। नेरळ-माथेरान येथे पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरडी व दगड कोसळण्याच्या घटना वाढत असतानाच माथेरान घाट मार्गावर महाकाय दगड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने त्यावेळी मार्गावर वाहनांची किंवा पर्यटकांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुसळधार पावसामुळे माथेरान घाटातील डोंगरकडे सैल झाल्याने हा मोठा दगड थेट रस्त्यावर येऊन पडला. त्यामुळे घाटमार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवावी लागली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा सकाळी घटनास्थळी दाखल झाली. दगड हटवून मार्ग पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. माथेरान घाट मार्ग हा पर्यटकांसह स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो. पावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः मुसळधार पाऊस सुरू असताना किंवा रात्रीच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्थानिकांनी घाटातील धोकादायक ठिकाणांचे तातडीने भू-तांत्रिक सर्वेक्षण करून संरक्षक जाळ्या, रॉक बोल्टिंग आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा माथेरान घाट मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पावसाळ्यात प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande