
* ठाण्यातील तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन
* २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड वर्षात तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार
ठाणे, 27 जुलै (हिं.स.) - विकास हीच आमची ओळख आहे. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. 'ठाणे बदलतंय' ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे शहराच्या विकासात आणखी एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले असून, आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी पार पडले. ठाणेकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरणार असून, शहरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वाहतूक सुधारणा प्रकल्पांपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे.
या निमित्ताने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन देखील पार पडले. यामध्ये इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते व पायाभूत सुविधा तसेच यशवंत रामा आंतरराष्ट्रीय तरण तलाव आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा समावेश होता.
यावेळी बोलताना शिंदे यांनी विकास हा घोषणांचा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीचा विषय असल्याचे अधोरेखित करत, भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी विकासकामे थांबवू नका; सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना दिल्या. विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही आणि पुढेही करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिंदे म्हणाले की, अनेक प्रकल्प अशक्य वाटत होते; मात्र ठाम इच्छाशक्ती, नियोजन आणि प्रशासकीय समन्वयाच्या बळावर ते पूर्ण करण्यात यश आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई, ठाणे, नाशिक आणि परिसरातील शहरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. हे प्रकल्प खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोपी कामे कोणालाही करता येतात; मात्र कठीण आणि आव्हानात्मक कामे पूर्ण करण्यातच खरी कसोटी असते, असे सांगत त्यांनी या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय मान्यता वेळेत मिळवून दिल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना मंजूर केलेला हा सुमारे २०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे तीन हात नाक्यावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या सात प्रमुख वाहतूक प्रवाहांपैकी चार प्रवाह सिग्नलमुक्त आणि सुरळीत होतील. त्यामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचणार आहेत.
कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे, छेडानगर, आनंदनगर, साकेत, गायमुख आणि फाउंटनपर्यंतच्या एलिव्हेटेड रोडसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटी आणि मुंबईकडून येणारी जड वाहतूक शहराबाहेरील मार्गाने वळविण्यात येणार असल्यामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रदूषणात मोठी घट होईल, असेही ते म्हणाले.
ठाणे–बोरिवली भुयारी मार्गामुळे अवघ्या २० मिनिटांत प्रवास शक्य होणार असल्याची माहिती देताना त्यांनी बांद्रा–वर्सोवा सी-लिंक प्रकल्पात स्थानिक कोळी बांधवांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर याबाबत तातडीने निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्पाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, या भागासाठी स्वतंत्र जलसंप उभारण्याची आवश्यकता अनेक वर्षांपासून होती. मात्र जागेअभावी हा प्रकल्प रखडला होता. २००८ मध्ये आमदार असताना एमआयडीसीची जमीन महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी ७२ लाख रुपये भरून ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे आज हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास गेला.
रूपादेवीचा पाडा पंप आणि इंदिरानगर पंप सुरू झाल्यामुळे नागरिकांना दररोज आणि वेळेवर पाणी मिळणार असून पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल, मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम टळेल आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
तीन हात नाका उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, तर रस्ते, मेट्रो आणि पॉड टॅक्सीमुळे ठाण्याची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत या योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
परिसरातील मुलांसाठी मैदान कायम खुले राहील, या जागेवर कोणतेही बांधकाम होणार नाही, असा शब्द देत रूपादेवी मंदिर परिसर आणि हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांची घोषणा त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी