
नांदेड, 27 जुलै (हिं.स.) : खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारत सहा बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कृषी विभागाने विविध ठिकाणांहून सोयाबीन बियाण्यांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. तपासणीत काही नमुने अप्रमाणित आढळले. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे नोंदवल्या होत्या.
या तक्रारींची तालुकास्तरीय समित्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीत बियाण्यांमध्ये दोष असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित सहा बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध बिलोली, भोकर, सोनखेड आणि किनवट पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कृषी संचालक (निरीक्षण व गुणनियंत्रण), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आणि कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तसेच संबंधित तालुक्यातील बियाणे निरीक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे, तसेच खरेदीची पावती आणि संबंधित कागदपत्रे जतन करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis