
16 कोटी निधीतून 6167 हेक्टरवर जलसंधारण,
11 हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार फायदा
छत्रपती संभाजीनगर, 27 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ९ गावांमध्ये 'वसुंधरा' या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समुह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबविला जाणार असून या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला,अशी माहिती वॉटरशेट ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर यांनी दिली. ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाणार असून, यासाठी एकूण १६ कोटी ०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० ते ४० किमी अंतरावर असणाऱ्या या ९ गावांमध्ये दरवर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र पाणीटंचाई जाणवते. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रकल्प वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेमार्फत राबविण्यात येणार असून टोयो टा किर्लोस्कर मोटर्स हे सामाजिक उत्तर दायित्व निधीचा विनियोग करणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सामंजस्य करार झाला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., उपवनसंरक्षक सुरेखा माने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, टोयोटा किर्लोस्करचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, उपाध्यक्ष (सामाजिक उत्तरदायित्व निधी) ए. रमेश राव, वॉटरशेड ऑर्गनायझेशनचे कार्यकारी अधिकारी प्रकाश केसकर, विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर आदी उपस्थित होते.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आराखडा:
• क्षेत्रफळ व विस्तार: ६,१६७ हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकास उपचार केले जातील, ज्याद्वारे २०% क्षेत्राला सिंचनाच्या कक्षेत आणण्याचे नियोजन आहे.
• लाभार्थी: २,३९८ कुटुंबांतील सुमारे ११,२६८ ग्रामस्थांना या प्रकल्पाचा थेट फायदा होईल.
• कालावधी: ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२९ (३ वर्षे).
निधीचा तपशील (एकूण ₹१६.०५ कोटी):
१.टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM): ₹९.३३ कोटी
२.महाराष्ट्र शासन (विविध शासकीय योजनांद्वारे): ₹५.४० कोटी
३.स्थानिक समुदाय/लोकसहभाग: ₹१.३३ कोटी
अंमलबजावणी व सहभाग:
हा प्रकल्प वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) या संस्थेमार्फत राबविला जाणार असून, टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) चे आर्थिक व तांत्रिक सहाय्य लाभणार आहे. तसेच, महाराष्ट्र शासन आपल्या विविध शासकीय योजनांचा (Convergence) ताळमेळ घालून प्रकल्पाला पूर्ण सहकार्य करणार आहे.
मुख्य उद्दिष्टे आणि अपेक्षित परिणाम:
• पिण्याच्या पाण्याची उपलब्धता: गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ९ महिन्यांवरून १२ महिने (वर्षभर) करणे.
• हवामान-अनुकूल शेती: जमिनीतील ओलावा वाढवून कृषी उत्पादकता वाढवणे आणि हवामान बदलास सक्षम असणाऱ्या शेती पद्धतींचा वापर करणे.
• रोजगार व उपजीविका: अल्पभूधारक, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण करणे.
• समुदाय सक्षमीकरण: लोकसहभागातून नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करणे आणि स्थानिक ग्राम संस्थांना प्रशिक्षण देऊन सक्षम करणे.
या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ९ गावांचे रूपडे बदलणार असून, पाणी आणि शेतीच्या बाबतीत हे क्षेत्र आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis