
अमरावती, २७ जुलै (हिं.स.) : धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या टिटंबा शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणात प्रशासनाने तातडीची कारवाई केली आहे. आश्रमशाळेचे अधीक्षक संदीप गोळे यांना निलंबित करण्यात आले असून, मुख्याध्यापक एम. पी. भागवत यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांची या शाळेतून बदली करण्यात येणार असल्याची माहिती धारणी प्रकल्प कार्यालयाने दिली.
विषबाधेची घटना शनिवार, २५ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली होती. या घटनेत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ६० पर्यंत पोहोचली. मात्र, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून काही विद्यार्थ्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनाही आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर, नायब तहसीलदार राजेश माळी, पोलिस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण तसेच माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, विद्यार्थ्यांना भोजन वाटप करताना सेंट्रल किचनमधील कर्मचाऱ्यांकडून किंवा शाळा प्रशासनाकडून नेमकी कोणती त्रुटी झाली, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, चौकशी अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना भोजन वाटप करताना नेमकी कुठे चूक झाली, याची चौकशी सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षकांना निलंबित करण्यात आले असून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती सिद्धार्थ शुक्ला, प्रकल्प अधिकारी, धारणी यांनी दिली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी