
बीड, 27 जुलै (हिं.स.)। बीड तालुक्यातील अंधापुरी गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे नेकनूर यांना दिलेल्या निवेदनात अंधापुरी गाव व परिसरात परवानगीशिवाय अवैध दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अवैध व्यवसायामुळे गावातील महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध दारू दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गावातील नागरिकांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली. या निवेदनामुळे अंधापुरी परिसरातील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिस प्रशासन याबाबत कोणती कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis