
नांदेड, 27 जुलै (हिं.स.) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण ६६८ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१८ रुग्णांना पुढील विशेष उपचारांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा येथे संदर्भित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी महादेव मठ संस्थान, हदगावचे श्री. ष. ब्र. १०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे तसेच निर्मल हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दत्ता मेघे हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका तसेच शिवसैनिकांनी मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि उपचाराचा लाभ मिळाला. नागरिकांनी या जनहिताच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले आणि आभार व्यक्त केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis