
अमरावती, 27 जुलै (हिं.स.) । खरिपाचा हंगाम पावसाच्या विलंबाने आणि बोगस बियाण्यांनी गाजत आहे. त्यामुळे यंदा पीक विम्याची खरी गरज असतानाही शेतकऱ्यांनी या विम्याचे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६४५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यातुलनेत यंदा २५ टक्क्यांपेक्षाही कमी म्हणून केवळ ३१ हजार ६६५ शेतकऱ्यांनीच विमा उतरविला आहे. मागील वर्षीच्या विम्यात जिल्ह्याला 'शून्य' मिळाल्यामुळे यंदा विम्यावरचा विश्वासच उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाने खरीप हंगामासाठी ३ जुलै रोजी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली. त्यासाठी जिल्ह्याचे काम इफ्को टोकिया या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत विम्याचे ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहे. मात्र २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील साडेचार लाख सातबारा धारक शेतकऱ्यांपैकी फक्त ३१ हजार शेतकऱ्यांनीच विम्याचे अर्ज दाखल केले आहेत. तर मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील पावणेदोन लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. त्यातच गेल्या वर्षीच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने झोडपून काढले, प्रचंड नुकसान झाल्यावर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला विम्याची भरपाई मिळाली नाही. त्याबाबत सर्वस्तरातून ओरड झाल्यावरही अजूनही शेतकऱ्यांना विमा भरपाईचा एक पैसाही मिळालेला नाही. त्यामुळे मन विमा उतरविण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. विम्यासाठी अजून काही दिवस म्हणजे ३१ जुलैपर्यंत अवकाश असला, तरी सध्याची गती पाहता ही संख्या अत्यल्प राहण्याचीच शक्यत अधिक आहे. केवळ चार दिवस शिल्लक असतानाही विमा उतरविणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांच्या वर सरकलेली नाही. त्यामुळे विम्यासाठी मुदतवाढ दिल्यावरही ही गती वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
पावणे दोन लाख शेतकऱ्यांची निराशा
मागील वर्षीच्या खरीप पिकांसाठी जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६४५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. तूर, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांसाठी तब्बल ३ लाख ६२ हजार ३४९ विमा अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र अतिवृष्टीत नुकसान होऊनही या शेतकऱ्यांना कवडीचीही भरपाई मिळाली नाही. प्रशासन अजूनही कागदोपत्री कार्यवाही सुरु असल्याचे भासवत आहे. तर लोकप्रतिनिधीत एकमेकांकडे बोट दाखविण्यात मश्गूल आहे. मागील हंगामातील हा वाईट अनुभव लक्षात आल्याने यंदा शेतकरी पीकविम्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी