
परभणी, 27 जुलै (हिं.स.)।
परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि त्यांना सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रचना नगर (उघडा महादेव परिसर) ते आर.पी. हॉस्पिटल अशी मोफत बस सेवा सोमवार (दि. २७ जुलै) पासून सुरू करण्यात आली. या बस सेवेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी परभणी बसस्थानक ते आर.पी. हॉस्पिटल तसेच खानापूर फाटा–वसमत रोड–बसस्थानक मार्गे मोफत बस सेवा सुरू असून या सेवेला रुग्ण व नातेवाईकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने आता शहरातील आणखी एका मार्गावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन बस सेवा रचना नगर येथून दररोज सकाळी १० वाजता सुटणार असून उघडा महादेव मंदिर (१०.१५), देशमुख हॉटेल (१०.३०), हडको कॉर्नर (१०.४५), सारनाथ कॉलनी पाटी (११.००), खंडोबा बाजार (११.१५), अपना कॉर्नर (११.३०) आणि पारदेश्वर मंदिर (११.४५) मार्गे आर.पी. हॉस्पिटल येथे पोहोचणार आहे. परतीची बस दुपारी ४ वाजता हॉस्पिटलमधून याच मार्गाने सुटणार आहे. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले की, रुग्णांना वेळेवर, सुलभ आणि मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे. या बस सेवेचा लाभ विशेषतः ग्रामीण व उपनगरातील रुग्णांना होणार असून त्यांच्या उपचाराचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होईल. परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सेवा आणि मोफत तपासणीच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आर.पी. हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटनप्रसंगी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महापौर सय्यद इकबाल, सभागृह नेते माजु लाला यांच्यासह नगरसेवक, शिवसैनिक, युवासैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis