सोलापूरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महावृक्षारोपण
सोलापूर, 27 जुलै (हिं.स.)। पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ विचारांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून देत ''हरित सोलापूर'' घडविण्याच्या उद्देशाने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने रविवारी सोलापुरात भ
सोलापूरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महावृक्षारोपण


सोलापूर, 27 जुलै (हिं.स.)। पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ विचारांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून देत 'हरित सोलापूर' घडविण्याच्या उद्देशाने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने रविवारी सोलापुरात भव्य महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील दहिटणे आणि रे नगर (कुंभारी) परिसरात एकूण १,८०९ देशी वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.

सोलापूर शहरातील वाढते तापमान, घटणारे हरित क्षेत्र आणि वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी हे अभियान आयोजित करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या वतीने 'एक माणूस – एक झाड' या संकल्पनेतून राज्यभरात लाखो वृक्षांची लागवड व संगोपन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून रविवारी सोलापुरात ही मोहीम हाती घेण्यात आली.

दहिटणे (राष्ट्रतेज घरकुल परिसर): येथे दोन गटांमध्ये एकूण ६४७ वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ झाडे लावून न थांबता, लावलेल्या प्रत्येक वृक्षाच्या नियमित संगोपनाची आणि जतनाची जबाबदारी प्रतिष्ठानच्या 'श्री सदस्यांनी' स्वीकारली आहे. यामुळे या झाडांचे जगण्याचे प्रमाण १००% राहण्यास मोठी मदत होणार आहे.विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे रे नगर परिसरात ३,००० झाडांची लागवड करून त्यांचे उत्तम प्रकारे संगोपन केले जात आहे. आज ही झाडे पूर्णपणे बहरली असून संपूर्ण रे नगर परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य दिसत आहे. या महाअभियानात प्रतिष्ठानचे शेकडो 'श्री सदस्य' उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सामूहिक जबाबदारीतून पुढील पिढीसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण करण्याचा मोलाचा संदेश या उपक्रमाद्वारे सोलापूरकरांना मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande