बीड जिल्ह्यात यंदा केवळ ८४ हजार शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा!
बीड, 27 जुलै (हिं.स.)। गतवर्षी अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊनही उत्पादकतेचे तांत्रिक कारण दाखवत भरपाई नाकारल्यामुळे, बीड जिल्ह्यातील बळीराजा यंदा पीक विमा योजनेबाबत प्रचंड निरुत्साही दिसत आहे. गेल्या वर्षी ११ लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता; मात्
पीक विमा


बीड, 27 जुलै (हिं.स.)।

गतवर्षी अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊनही उत्पादकतेचे तांत्रिक कारण दाखवत भरपाई नाकारल्यामुळे, बीड जिल्ह्यातील बळीराजा यंदा पीक विमा योजनेबाबत प्रचंड निरुत्साही दिसत आहे. गेल्या वर्षी ११ लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता; मात्र यंदा शनिवारपर्यंत अवघ्या ८४ हजार ७९६ शेतकऱ्यांनी २ लाख २४ हजार ३५० अर्ज दाखल करून ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र विमाछत्राखाली आणले आहे.

संकटाच्या वेळी विमा कंपन्यांकडून ऐनवेळी हात वर केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या परिस्थितीतही बिगर-कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग काहीसा अधिक असून केज तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार १४ अर्ज आले आहेत, तर वडवणी तालुक्यात अवघ्या १,१३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ऐनवेळी पोर्टलवरील तांत्रिक खोळंबा टाळण्यासाठी ३१ जुलैच्या मुदतीपूर्वी महा-ई-सेवा केंद्रांवरून विमा भरण्याचे आवाहन कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र, जुन्या कटू अनुभवांमुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande