सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा प्रक्रिया यशस्वी
पुणे, 27 जुलै (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल–मे २०२६ परीक्षा सत्र यशस्वीरीत्या पूर्ण करत विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रभावीपणे राबविले. परीक्षा नियोजन, परीक्षा संचालन, मूल्यमापन आणि निका
University Pune SPUU


पुणे, 27 जुलै (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल–मे २०२६ परीक्षा सत्र यशस्वीरीत्या पूर्ण करत विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रभावीपणे राबविले. परीक्षा नियोजन, परीक्षा संचालन, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण करून विद्यापीठाने विविध पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या.

विधी (Law), शिक्षण (Education) व शारीरिक शिक्षण शाखांचे निकाल ३० जून २०२६ पूर्वी जाहीर करण्यात आले. तसेच बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. (२०१९ पॅटर्न) या पदवी अभ्यासक्रमांचे निकालही जून अखेरीस प्रसिद्ध करण्यात आले. एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. (२०१९ पॅटर्न) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल २० जुलैपूर्वी, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल २४ जुलैपूर्वी जाहीर करण्यात आले.

कला (Arts), वाणिज्य (Commerce), विज्ञान (Science), अभियांत्रिकी (Engineering), विधी (Law), शिक्षण (Education) तसेच इतर विविध पदवी (UG), पदव्युत्तर (PG) आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांचे निकाल नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात आले.अभियांत्रिकी (Engineering) अंतिम, अंतिमपूर्व वर्ष, बी.फार्मसी अंतिम आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांचे निकाल १५ जुलै २०२६ पर्यंत जाहीर करण्यात आले. त्यानंतर अभियांत्रिकी प्रथम व द्वितीय वर्ष तसेच एमबीए अभ्यासक्रमांच्या निकालांची प्रक्रियाही नियोजित वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून विद्यापीठाने N+2+1 नियमानुसार अभ्यासक्रमाची मुदत (टर्म) संपलेल्या विद्यार्थ्यांना तसेच अंतिम वर्ष आणि प्री-फायनल वर्षातील बॅकलॉग विद्यार्थ्यांना एप्रिल–मे २०२६ विद्यापीठ परीक्षेस बसण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची आणि पदवी संपादन करण्याची महत्त्वपूर्ण संधी प्राप्त झाली.

विद्यापीठाच्या विशेष संधीच्या उपक्रमामुळे नियमित विद्यार्थ्यांसोबतच N+2+1 अंतर्गत मुदत संपलेले विद्यार्थी, टर्म संपलेले विद्यार्थी अंतिम व प्री-फायनल वर्षातील बॅकलॉग विद्यार्थी यांनाही शिक्षण पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली. वेळेत परीक्षा घेणे, पारदर्शक मूल्यमापन करणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने निकाल जाहीर करणे या माध्यमातून विद्यापीठाने विद्यार्थीहित, पारदर्शकता आणि कार्यक्षम परीक्षा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विद्यापीठ प्रशासन, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व संबंधितांच्या सहकार्यामुळे एप्रिल–मे २०२६ परीक्षा सत्र यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी चालना मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande