
परभणी, 27 जुलै (हिं.स.)।
परभणी तालुक्यातील शेतरस्ते, सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनाने ठोस भूमिका घेतली असून, सात दिवसांत अतिक्रमण न काढल्यास महसूल विभागामार्फत ते हटवून खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसह शासकीय योजनांपासूनही वंचित राहावे लागू शकते, असे तहसीलदार संदीप राजपुरे यांनी स्पष्ट केले आहे. परभणी तहसील अंतर्गत गाव नकाशावर दर्शविण्यात आलेले तसेच शासकीय जागेतील शेतरस्ते, सार्वजनिक रस्ते व ये-जा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या मार्गावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या ये-जा करण्याच्या हक्कावर परिणाम होत असून शेतीकामात अडथळे निर्माण होत आहेत.याबाबत संबंधित अतिक्रमणधारकांना तहसीलदार कार्यालयामार्फत सदर अतिक्रमण सात दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून टाकण्याची नोटीस देण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास संबंधित अतिक्रमण शासन स्तरावरून महसुल विभागा मार्फत काढण्यात येईल. या कारवाईसाठी होणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून नियमानुसार वसूल करण्यात येईल.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १४३ अन्वये किंवा मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ मधील कलम ५ अन्वये इतर शेतकऱ्यांच्या ये-जा करण्याचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे, अशा शेतरस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत पीक लागवड करणे, रस्ता अडविणे अथवा रस्त्याचा वापर रोखणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरले जाणार नाही.तसेच शेतरस्त्यांचे नुकसान करणे, रस्ता बुजविणे, अतिक्रमण करणे अथवा सार्वजनिक वापरात अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत.याशिवाय, शासनाच्या धोरणानुसार अशा प्रकारचे अतिक्रमण अथवा शेतरस्त्यांचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड व फार्मर आयडी ५ वर्षांसाठी ब्लॉक करण्याची तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ व शासकीय मदत मिळण्यास अपात्र ठरविण्याची कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत करण्यात येऊ शकते.सर्व शेतकरी व नागरिकांनी गाव नकाशावरील तसेच कायदेशीररित्या अस्तित्वात असलेल्या शेतरस्त्यांवर कोणतेही अतिक्रमण करू नये. ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले असेल ते स्वयंस्फूर्तीने तात्काळ काढून प्रशासनास सहकार्य करावे. असे अवाहन तहसिलदार संदीप राजपुरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis