
नागपूर, 28 जुलै (हिं.स.) : ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक लक्ष्मण त्र्यंबक जोशी यांचे आज, मंगळवारी 28 जुलै रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. गेल्या 3 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळ त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला 'तरुण भारत' या दैनिकात पत्रकार म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले आणि 'तरुण भारत' मध्ये कार्यरत राहिले. पुढे त्यांनी 'लोकशाही वार्ता' या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निर्भीड लेखन आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली. त्यांच्या लेखणीने अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडली तसेच नवोदित पत्रकारांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आणिबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवार २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता, १७९, पुखराज दुलिप अपार्टमेंट सहकार नगर येथील निवासस्थानावरून निघणार असून त्यांच्या पार्थिवावर सहकार नगर घाट येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदेश जारी करत ल.त्र्यं. जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी