नागपुरात मुसळधार पाऊस; सोमलवार शाळा परिसर जलमय
नागपूर, 28 जुलै (हिं.स.) : नागपूर शहरात आज, मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी 12.30 वाजेपासून 3 वाजेदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त
पावसाचे संग्रहित छायाचित्र


नागपूर, 28 जुलै (हिं.स.) : नागपूर शहरात आज, मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी 12.30 वाजेपासून 3 वाजेदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

नागपूरच्या खामला परिसरातील सोमलवार स्कूल (निकालस शाखा) आणि राणाप्रताप नगर रोड परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शाळा सुरू असतानाच विद्यार्थ्यांना या समस्येचा सामना करावा लागला. शाळेच्या परिसरात ये-जा करणेही कठीण झाले होते. लहान मुलांना कडेवर घेऊन आणि मोठ्या बालकांना दोराच्या मदतीने बाहेर आणण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते, या भागातील रस्त्याचे काम उन्हाळ्यातच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे काम वेळेत पूर्ण झाले नाही. परिणामी, शाळे सरमोरचा रस्ता उंचावर गेल्यामुळे शाळेचे मैदान आणि इमारतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या दुर्लक्षाचा फटका विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांना बसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, हवामान विभागाने विदर्भासाठी पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत 100 ते 150 मिमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही भागांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी सध्या यलो अलर्ट लागू आहे. मात्र, 29 आणि 30 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande