दिवसभराच्या चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह झाला बंद
नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी दिवसभर मर्यादित चढ-उतार पाहायला मिळाल्यानंतर अखेर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. निफ्टी, बँक निफ्टी तसेच एनएसईवरील इतर निर्देशांक आणि समभागांच्या डेरिव्हेटिव्ह करारांच्या मंथली एक्सपायरी
Stock Market Closing


नवी दिल्ली, 28 जुलै (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी दिवसभर मर्यादित चढ-उतार पाहायला मिळाल्यानंतर अखेर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. निफ्टी, बँक निफ्टी तसेच एनएसईवरील इतर निर्देशांक आणि समभागांच्या डेरिव्हेटिव्ह करारांच्या मंथली एक्सपायरीचा परिणाम आजच्या व्यवहारावर स्पष्टपणे दिसून आला. सकाळी बाजाराची सुरुवातही सौम्य घसरणीसह झाली होती. त्यानंतर दिवसभर खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात वर्चस्वासाठी चुरस सुरू राहिल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सतत चढ-उतार होत राहिले. अखेरीस सेन्सेक्स ०.०९ टक्के आणि निफ्टी ०.०४ टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह व्यवहार संपवला.

बीएसईचा सेन्सेक्स ७६,८३१.७५ अंकांवर उघडला होता. दिवसाच्या व्यवहारात तो एका टप्प्यावर ७६,९८८.४८ अंकांपर्यंत पोहोचला, तर विक्रीचा दबाव वाढल्यानंतर ७६,६७२.७७ अंकांपर्यंत घसरला. अखेरीस सेन्सेक्स ६९.८६ अंकांच्या घसरणीसह ७६,७६५.९२ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी २३,९७१.२५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात करून दिवसात २४,०४१.१५ अंकांपर्यंत वाढला, तर खालच्या पातळीवर तो २३,९५४.६० अंकांपर्यंत घसरला. दिवसअखेर निफ्टी १०.६० अंकांनी घसरून २३,९८५.३५ अंकांवर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील समभागांना मोठी मागणी मिळाली. त्यामुळे निफ्टी आयटी इंडेक्स ३.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय रिअल्टी, ऑटोमोबाईल, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रातील समभागांनीही चांगली कामगिरी केली. मात्र कॅपिटल गुड्स क्षेत्रावर मोठा विक्रीचा दबाव राहिल्याने बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स २.४० टक्क्यांनी घसरला. बँकिंग, एफएमसीजी, हेल्थकेअर, मेटल आणि पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस क्षेत्रातील निर्देशांकही लाल निशाणात बंद झाले. ब्रॉडर मार्केटमध्ये संमिश्र चित्र दिसून आले. निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये ०.०८ टक्क्यांची वाढ झाली, तर स्मॉलकॅप इंडेक्स ०.२२ टक्क्यांनी घसरला.

बाजारातील या घसरणीचा फटका गुंतवणूकदारांनाही बसला. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ४८०.३३ लाख कोटी रुपयांवरून घसरून ४७९.२२ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.११ लाख कोटी रुपयांची घट झाली.

दिवसभरात बीएसईवर ४,४२४ समभागांमध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,६२६ समभाग वाढीसह, २,६२९ समभाग घसरणीसह, तर १६९ समभाग कोणताही बदल न होता बंद झाले. एनएसईवर २,९८६ समभागांमध्ये व्यवहार झाले. यापैकी ९३८ समभाग वाढले, तर २,०४८ समभाग घसरले.त्याचप्रमाणे, सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० शेअर्सपैकी १७ शेअर्स वाढीसह आणि १३ शेअर्स तोट्यात बंद झाले. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या ५० शेअर्सपैकी ३० शेअर्स वाढीसह, तर २० शेअर्स घसरणीसह बंद झाले. मोठ्या समभागांमध्ये टीसीएस, एटर्नल, टेक महिंद्रा, नेस्ले आणि सिप्ला हे सर्वाधिक वाढ नोंदवणारे समभाग ठरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोल इंडिया, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि एनटीपीसी या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande