वारकऱ्यांसाठीच्या मोफत चष्मा योजनेला विलंब; निविदा प्रक्रियेमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर, 28 जुलै (हिं.स.)।आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने ₹५० लाखांची तरतूद केली होती. मात्र, चष्मे खरेदीची निविदा प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने वारी संपेपर्यंत लाभार्थ्यांना चष्म्यांचे वि
Wari darshan


सोलापूर, 28 जुलै (हिं.स.)।आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने ₹५० लाखांची तरतूद केली होती. मात्र, चष्मे खरेदीची निविदा प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने वारी संपेपर्यंत लाभार्थ्यांना चष्म्यांचे वितरणच होऊ शकले नाही. परिणामी, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा मूळ उद्देशच अपूर्ण राहिल्याचे दिसून आले आहे.

आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने १८ जुलै रोजी चष्मे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर २२ जुलै रोजी प्री-बिड बैठक पार पडली, तर २४ जुलै रोजी निविदा उघडण्यात आली. आषाढी वारी संपण्याच्या अवघ्या एक दिवस आधी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने कार्यारंभ आदेश, चष्म्यांचा पुरवठा आणि प्रत्यक्ष वितरणासाठी आवश्यक कालावधीच उपलब्ध झाला नाही.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आषाढी वारीच्या कालावधीत सर्व विभागप्रमुखांनी पंढरपुरात उपस्थित राहून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याच काळात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याची चर्चा सुरू आहे.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा डोईफोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.शासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी निधी उपलब्ध करून दिला असला, तरी नियोजनातील विलंबामुळे लाभार्थ्यांपर्यंत योजना वेळेत पोहोचू न शकल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande