'सिने टॉकीज 2026'चा अधिकृत शुभारंभ; पोस्टरचे अनावरण
मुंबईत आगामी 11 ते 13 डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय संवाद मुंबई, 31 जुलै (हिं.स.) : भारतीय चित्रपटसृष्टी, संस्कृती आणि समाजाच्या विविध पैलूंवर आधारित राष्ट्रीय संवाद मंच ‘सिने टॉकीज 2026’चा अधिकृत शुभारंभ संस्कार भारती, कोकण प्रांताच्या वतीने आयोजित म
सिने टॉकीज 2026' का आधिकारिक शुभारंभ संस्कार भारती कि ओर से पोस्टर रिलीज करते हुए पदाधिकारी


मुंबईत आगामी 11 ते 13 डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय संवाद

मुंबई, 31 जुलै (हिं.स.) : भारतीय चित्रपटसृष्टी, संस्कृती आणि समाजाच्या विविध पैलूंवर आधारित राष्ट्रीय संवाद मंच ‘सिने टॉकीज 2026’चा अधिकृत शुभारंभ संस्कार भारती, कोकण प्रांताच्या वतीने आयोजित मासिक गोष्ठीत करण्यात आला. मालाड येथील डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात चंद्रशेखर वामन वझे, प्रशांत निळकंठ देशपांडे, ऋषिकेश जोशी आणि ध्रुव कंडपाल यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

सिने टॉकीज 2026चे आयोजन आगामी 11,12 आणि 13 डिसेंबर 2026 रोजी मुंबईतील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल, फिल्म सिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव येथे होणार आहे. यंदाच्या संवादाची संकल्पना सिनेमा : काल, आज आणि उद्या अशी निश्चित करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय संवादामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे समकालीन स्वरूप, आव्हाने आणि भविष्यातील संधी यांवर चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, तांत्रिक तज्ज्ञ तसेच युवा सर्जक यांच्यात सखोल चर्चा होणार आहे.

या संवादात ‘समाजाचे प्रतिबिंब की समाजाचा निर्माता’, ‘साहित्य आणि सिनेमा’, ‘बाल सिनेमा’, ‘सिनेमा : प्रचार, विचार आणि मनोरंजन’, तसेच ‘चित्रपटसृष्टीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) : गरज, नैतिकता आणि भविष्य’ अशा समकालीन विषयांवर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.याशिवाय पटकथा लेखन, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, ध्वनी आणि संगीत, डिजिटल तंत्रज्ञान, ओटीटी प्लॅटफॉर्म, कंटेंट निर्मिती, भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक प्रवास, वर्तमान परिस्थिती आणि बदलते सिनेमाई प्रवाह या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद आणि मुक्त संवाद आयोजित केले जाणार आहेत.

‘सिने सृष्टी, भारतीय दृष्टी’ या संकल्पनेवर आधारित सिने टॉकीजचे उद्दिष्ट सिनेमा, समाज, संस्कृती आणि भारतीय विचार यांच्यात अर्थपूर्ण संवाद निर्माण करणे आहे. तसेच अनुभवी चित्रपट निर्माते आणि युवा सर्जक यांच्यात सर्जनशील विचारांची देवाणघेवाण आणि सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हेही या मंचाचे महत्त्वाचे ध्येय आहे.

पोस्टर अनावरणासह सिने टॉकीज 2026 साठी नोंदणी प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. इच्छुक सहभागी पोस्टरवरील क्यूआर-कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती www.cinetalkies.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande