'सनई चौघडे'मुळे मला माझी जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली - मेघना एरंडे जोशी
मुंबई, 31 जुलै, (हिं.स.)। खरी मैत्री ही काळ, अंतर आणि परिस्थिती यापलीकडे जाऊन टिकून राहते. काही नाती अशी असतात ज्यांचा आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी होतो, पण योग्य वेळ आली की ती पुन्हा पूर्वीइतक्याच आपुलकीने फुलतात. अशीच एक सुंदर मैत्री पुन्हा खुल
मेघना एरंडे जोशी


मुंबई, 31 जुलै, (हिं.स.)। खरी मैत्री ही काळ, अंतर आणि परिस्थिती यापलीकडे जाऊन टिकून राहते. काही नाती अशी असतात ज्यांचा आयुष्याच्या धावपळीत संपर्क कमी होतो, पण योग्य वेळ आली की ती पुन्हा पूर्वीइतक्याच आपुलकीने फुलतात. अशीच एक सुंदर मैत्री पुन्हा खुलली आहे 'सनई चौघडे' या मालिकेमुळे. मालिकेत ‘पमा परब’ची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडे जोशी यांनी ‘तेजस्विनी खानोलकर’ची भूमिका साकारणाऱ्या अदिती सारंगधरसोबतच्या त्यांच्या अनेक वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा एक खास किस्सा सांगितला.

मेघना म्हणाली, अदिती आणि मी अकरावीपासून पदवीपर्यंत एकाच बॅचमध्ये होतो. ती रुईया कॉलेजमध्ये होती आणि मी रुपारेलमध्ये. एकांकिका स्पर्धांमुळे आमची नेहमी भेट व्हायची. त्या काळात आमच्यात कधीच स्पर्धा नव्हती. आम्ही एकमेकींच्या कामाचं मनापासून कौतुक करायचो. कॉलेज संपल्यानंतर मात्र आयुष्याच्या धावपळीत आमचा संपर्क फक्त 'हाय-हॅलो'पुरता राहिला.'सनई चौघडे'मुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मालिकेत आमची पात्रं एकमेकींच्या अगदी विरुद्ध आहेत. पमा तेजस्विनीला घाबरते, तर तेजस्विनीला पमाची उपस्थितीही आवडत नाही. पण खऱ्या आयुष्यात चित्र अगदी उलट आहे.आमचे मेकअप रूम शेजारी आहेत. आम्ही एकत्र जेवतो, कॉफी पितो, गाणी ऐकतो, व्हिडिओ पाहतो आणि खूप गप्पा मारतो. अदितीला माझ्या डब्यातले थोडं गोडसर भाज्या असतात ते तिला आवडतात, तर तीही माझ्यासाठी काही खास बनवले कि घेऊन येते. आम्ही राजगिरा लाडू खातो. मी तिला वॉटर सिपर दिला होता, तर तिने मला डिझायनर बॅग ज्यावर खरे घुंगरू विणले आहे खूप सुंदर बॅग भेट दिली आहे. माझ्या मके-अप रूम मध्ये स्वामींची मूर्ती आहे ती हमखास येऊन नमस्कार करते. आमच्या गप्पांमध्ये अध्यात्मालाही विशेष स्थान असतं. ती रेकी करते, तर मी प्राणिक हीलिंग करते. त्यावर आम्ही अनेकदा चर्चा करतो. आम्हा दोघींनाही संगीताची खूप आवड आहे. सेटवर वेळ मिळाला की आम्ही एकत्र संगीत ऐकतो, कॉफी पितो आणि एकमेकींसोबत वेळ घालवतो. आमचे स्वभाव मात्र खूप वेगळे आहेत. अदिती खूप ठाम, उत्साही आणि बिनधास्त, रॉकस्टार आहे, तर मी एकदम भावगीत, कमी बोलणारी आहे. पण कदाचित हाच आमच्या मैत्रीचा सर्वात मोठा गुण आहे. आम्ही एकमेकींना समजून घेतो, एकमेकींची साथ देतो आणि मनातल्या अनेक गोष्टी एकमेकींसोबत शेअर करतो. सेटवर तिचे सीन नसले की तिची खूप आठवण येते. ती आली की वातावरणच आनंदी होतं. 'सनई चौघडे'मुळे मला माझी जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली. ही मैत्री आजही तितकीच सुंदर, प्रामाणिक आणि घट्ट आहे. आयुष्याने आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणलं, याचा मला मनापासून आनंद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande