
नांदेड, 08 जुलै (हिं.स.)
संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'बैठक फाऊंडेशन, पुणे' यांच्या वतीने संगीत, वादन आणि कथक नृत्याची प्रेरणादायी त्रिवेणी कार्यशाळा संस्था संकुलात पार पडली. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. पल्लवी पोटे, कथक नृत्यांगना श्रीमती स्वरूपा भोंडे आणि तबला वादक श्री. सन्मित रणदिवे यांच्या अनुभव, तालिम आणि प्रयोग या त्रिसूत्री उपक्रमातून उपस्थित होते. गायन, वादन व नृत्य अशा तीन कौशल्य गटात विद्यार्थी विभागण्यात आले.
गायन कार्यशाळेत डॉ. पल्लवी पोटे यांनी राग अहिर भैरव मधील बडा व छोटा ख्याल तसेच नाट्यगीतांची प्रभावी प्रस्तुती सादर केली. याचबरोबर विद्यार्थ्यांनी राग यमन आणि वृंदावनी सारंग सादर करून आपल्या संगीत साधनेची झलक दाखवली.
तबला कार्यशाळेत श्री. सन्मित रणदिवे यांनी तबल्याचा इतिहास, रचना आणि तीनतालातील पेशकार, कायदे, रेला व सवाल-जवाब यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थ्यांना तालविश्वाची सुंदर सफर घडवली.
कथक कार्यशाळेत श्रीमती स्वरूपा भोंडे यांनी कथकची परंपरा, विविध घराणी, नमस्कार, श्लोक आणि हस्तमुद्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत विद्यार्थिनींना भारतीय नृत्यसंस्कृतीची ओळख करून दिली.
कौशल्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले. हायस्कूल, कॉन्सेप्ट स्कूल आणि प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. केवळ मनोरंजन नव्हे, तर भारतीय अभिजात कला, संस्कार आणि सर्जनशीलतेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची ही विद्यार्थ्यांसाठी अनमोल संधी ठरली. पुढील काळात ग्रामीण भागातील संस्थेच्या विद्यार्थ्याना संगीताचे धडे ते देणार आहेत. प्रज्ञान सभागृहात सर्व संस्था कार्यकर्त्यांसाठी डॉ. पल्लवी पोटे यांनी तबला वादक श्री. सन्मित रणदिवे व हार्मोनियम वादक वेदांत गिरगावकर यांच्या साथीने स्वरांजली हा गायनाचा कार्यक्रम सादर केला.
संस्कृति संवर्धन मंडळात शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही समान महत्त्व दिले जाते. अशा प्रेरणादायी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना नवी दिशा आणि नवे आकाश मिळत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis