
नांदेड, 08 जुलै (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन व निर्मिती मंडळाकडून इयत्ता सहावीचे ‘व्यावसायिक शिक्षण’ हे नवीन पाठ्यपुस्तक अधिकृतरीत्या प्रकाशित करण्यात आले आहे. तब्बल ९५ दिवसांच्या शैक्षणिक व तांत्रिक प्रक्रियेनंतर NCERT कडून प्रकाशनास मंजुरी मिळाल्यानंतर हे पुस्तक राज्यभर सार्वत्रिक करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण पाठ्यपुस्तकातील काही भागाच्या लेखनात संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी संचालित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील व्यवसाय पूर्व अभ्यासक्रम विभागाचे समर्पित अध्यापक श्री. नागोराव माचापुरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
संस्थेतील व्यवसाय पूर्व अभ्यासक्रम विभागात गेली अनेक वर्षे विद्यार्थीकेंद्रित, कल्पक आणि सातत्यपूर्ण कार्य करत असताना त्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण योगदानाची ही राज्यस्तरीय दखल आहे. एक शिक्षक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून विद्यार्थ्यांच्या भविष्यास आकार देणाऱ्या भूमिकेपर्यंत पोहोचला आहे, ही संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.
याप्रसंगी श्री. नागोराव माचापुरे म्हणाले,
एक अध्यापक ते महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पुस्तक निर्मिती समितीचा सदस्य हा माझा प्रवास संस्थेने दिलेल्या जबाबदाऱ्या, सातत्याने काम करण्याची संधी आणि कामावरील प्रेम यामुळेच शक्य झाला. या संस्थेचा मी कायम ऋणी आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis