नांदेडमध्ये चिंतन बैठक संपन्न
नांदेड, 08 जुलै (हिं.स.) शिक्षणातील गुणवत्ता, अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती आणि शिक्षकांमधील शैक्षणिक विचारमंथनाला चालना देण्याच्या उद्देशाने हायस्कूल विभागाच्या पाचव्या शैक्षणिक चिंतन बैठकीचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाव
अ


नांदेड, 08 जुलै (हिं.स.)

शिक्षणातील गुणवत्ता, अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती आणि शिक्षकांमधील शैक्षणिक विचारमंथनाला चालना देण्याच्या उद्देशाने हायस्कूल विभागाच्या पाचव्या शैक्षणिक चिंतन बैठकीचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. आगामी शैक्षणिक वर्षासाठी कृतीशील दिशा निश्चित करणे, विविध विषयांतील उत्तम अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि बदलत्या काळातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक नियोजन करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता. मागील पाच वर्षापासून सर्व कार्यकर्ते नवीन ठिकाणी एकत्र येऊन ही बैठक आयोजित करत असतात. यातून इतर ठिकाणाचा परिसर व नवीन बाबी पाहण्यात येतात.

धर्माबाद येथे झालेल्या पाचव्या चिंतन बैठकीचे उद्घाटन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जोशी यांनी ए.आय.च्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नैतिक मूल्यांचे शिक्षण, सामाजिक जाणीव आणि चारित्र्यसंवर्धन तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षक आणि युवा वर्गाच्या सकारात्मक पुढाकारातूनच समाजात विधायक परिवर्तन घडू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे संचालक श्री. रोहित देशमुख यांनी विविध विषयांच्या गटचर्चेत प्रत्यक्ष सहभागी होत शिक्षकांशी संवाद साधला. हायस्कूल विभागामार्फत दरवर्षी सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या शैक्षणिक चिंतन बैठकीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या चिंतन बैठकीत सर्व विषय समित्यांनी अभ्यासपूर्ण गटचर्चा करून कृतीशील सूचना मांडल्या तसेच प्रभावी पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे आपल्या विषयांचा आढावा सादर केला. शिक्षकेतर कर्मचारी आणि सपोर्ट स्टाफ यांनीही आपल्या कार्याचे चिंतनात्मक व अभ्यासपूर्ण सादरीकरण करून बैठकीत मोलाची भर घातली.

या बैठकीच्या आयोजनासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी तथा धर्माबाद केंद्रप्रमुख श्री. आबासाहेब मलकाजी उस्केलवार आणि डॉ. बालाजी श्रीगिरे यांनी विशेष सहकार्य केले. हायस्कूल विभागातील सर्व संस्था कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत ही बैठक ज्ञान, अनुभव आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीचे प्रभावी व्यासपीठ ठरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande