
जालना, 08 जुलै (हिं.स.) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि शाश्वत कृषी विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून जालना जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत जिल्ह्यातील 3 हजार शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी आर्थिक, तांत्रिक आणि प्रशिक्षणाचे सर्वंकष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, आधुनिक शेतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना AU Small Finance Bank च्या माध्यमातून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण, अत्याधुनिक तांत्रिक मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनपर सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे रेशीम शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलून ती एक सक्षम ग्रामीण उद्योगव्यवस्था म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या उपक्रमात जिल्हा प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असणार आहे. रेशीम उद्योजक शेतकऱ्यांना पूर्वसंमती, अंदाजपत्रक तयार करणे, अनुदानासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही, प्रशिक्षण आणि विविध शासकीय प्रक्रियांचे मार्गदर्शन प्रशासनामार्फत केले जाणार असून, संपूर्ण उपक्रमावर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना नियंत्रण ठेवणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून 3 हजार शेतकऱ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. आधुनिक आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रभावी प्रयत्न ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी सांगितले की, देशात खरी नवक्रांती घडवायची असेल तर शेतकऱ्यांच्या प्रति एकर उत्पन्नात वाढ होणे अत्यावश्यक आहे. याच ध्येयाने ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून, आजपर्यंत 5 हजारांहून अधिक गावे आणि 34 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचले आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) यांनी केलेल्या स्वतंत्र परीक्षणात ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या उत्पादनात दहापट वाढ झाल्याचे आढळून आले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. येणाऱ्या काळात हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राज्यभर विस्तारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
कृषीकुल येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, सनदी अधिकारी आर. रंगमंजू, प्रकल्प संचालक (आत्मा) अमोल आगवाण, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, गजानन जंजाळ तसेच ग्लोबल विकास ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर उपस्थित मान्यवरांनी सिरसाळा येथे भेट देऊन ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात 108 किलोमीटर नद्यांचे पुनरुज्जीवन, सिरसाळा तलावाचे खोलीकरण आणि विविध जलसंवर्धन उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामांचे कौतुक करत ग्रामीण विकासासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून उभारल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis