
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
बालवाचकांसाठी दर्जेदार बालसाहित्य निर्माण करणारे त्रैमासिक म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या ‘कुल्फी’चे संपादक व प्रकाशक कृतार्थ आणि निखिल या जोडगोळीने मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था संचलित सौ. केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांसमोर विविध बालसाहित्याचे भन्नाट सादरीकरण केले.
विविध गाणी, गोष्टी, बडबडगीते, नाट्यछटा, अभिवाचन आदी बालमनाला आवडणाऱ्या साहित्यप्रकारांचे ओघवत्या, रंजक आणि नाट्यमय शैलीत सादरीकरण करून कृतार्थ-निखिल यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खळखळून दाद दिली.
यावेळी अभिवाचन, संवादफेक, भाषाशैली, अभिनय, भावमुद्रा आणि सादरीकरणाच्या विविध पैलूंबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकडूनही विविध साहित्यप्रकारांचे सादरीकरण करून घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, उत्तम नाट्यसंस्कार व्हावेत आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय समिती अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तसेच कृतार्थ आणि निखिल यांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis