
इस्लामाबाद, 14 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानने आपल्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजीही भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सिंधू पाणी कराराबाबत भारताला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या वाट्याच्या पाण्यावर कोणताही करार होणार नाही. जर ते थांबवण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला, तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाच्या सुरुवातीपूर्वी गुरुवारी रात्री राजधानी इस्लामाबादमध्ये ‘यादगार-ए-फतह’ या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन केली. मात्र, त्यानंतर त्यांनी लगेचच भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताकडून झालेल्या कारवाईचा संदर्भ देत शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानची नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, भारताने सिंधू जल करार एकतर्फी पद्धतीने स्थगित केला आहे. करारानुसार पाकिस्तानच्या जलहक्कांवर कोणताही परिणाम होता कामा नये. आमच्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब ही लाल रेषा आहे. इतकंच नाही, तर पाकिस्तानला शेजारील देशांसोबत शांतता हवी आहे, परंतु त्याच्या शांततेच्या इच्छेला कमजोरी समजू नये, जर कोणी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला आव्हान दिले, तर त्याला मे 2025 पेक्षाही अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. असा इशाराही त्यांनी दिला. यासोबतच त्यांनी भारतावर शांततेचा शत्रू असल्याचा खोटा आरोपही केला.
पाकिस्तानने ‘यादगार-ए-फतह’ स्मारकाबाबत म्हटले की, पाकिस्तानसाठी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ आणि ‘मरका-ए-हक’च्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.या कार्यक्रमात पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दावा केला की, पाकिस्तानला “शांततेची हमी देणारा देश” म्हणून ओळख मिळाली आहे.
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सिंधू जल करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील सहा नद्यांचे वाटप करण्यात आले होते. भारताला रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्याचा वापर करण्याचा अधिकार मिळाला. पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी देण्यात आले. मात्र, एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून हा मुद्दा दोन्ही देशांमधील तणावाचे मोठे कारण बनला आहे. भारताचे म्हणणे आहे की, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाविरोधात ठोस आणि विश्वासार्ह कारवाई करत नाही, तोपर्यंत करारावरील बंदी कायम राहील. तर, पाकिस्तानचा दावा आहे की हा करार अजूनही कायदेशीररित्या प्रभावी आहे आणि तो एकतर्फी निलंबित केला जाऊ शकत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode