विक्रीच्या दबावाने शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स ७० अंकांनी कोसळला
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी दिवसभर दबावाचे वातावरण राहिल्याने प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सुरुवातीपासूनच बाजारात विक्रीचा दबाव जाणवत होता. दुपारी दीड वाजल्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने सेन्सेक्स आणि नि
Stock Market Closing


नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी दिवसभर दबावाचे वातावरण राहिल्याने प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सुरुवातीपासूनच बाजारात विक्रीचा दबाव जाणवत होता. दुपारी दीड वाजल्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून चांगली सुधारणा केली. मात्र नकारात्मक वातावरणामुळे ही तेजी टिकू शकली नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ७०.७१ अंक म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरून ७८,००९.२५ अंकांवर, तर निफ्टी २९.८५ अंक म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी घसरून २४,३६६ अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७६.५३ अंकांच्या घसरणीसह ७७,९०३.४३ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या सत्रात विक्री वाढल्याने तो ३९५.५९ अंकांनी घसरून ७७,६८४.३७ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर खरेदी वाढल्याने सेन्सेक्सने ३६४.५४ अंकांची सुधारणा करत ७८,०४८.९१ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र अखेर पुन्हा विक्रीचा दबाव आल्याने तो घसरणीसह बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३३.९५ अंकांनी घसरून २४,३६१.९० अंकांवर उघडला. सुरुवातीच्या विक्रीमुळे तो ९९.०५ अंकांनी घसरून २४,२९६.८० अंकांपर्यंत खाली आला. नंतर खरेदी वाढल्याने निफ्टीने १०८.४० अंकांची सुधारणा करत २४,४०५.२० अंकांची दिवसातील उच्चांकी पातळी गाठली. मात्र ही तेजी फार काळ टिकली नाही.

क्षेत्रनिहाय व्यवहारात ग्राहक टिकाऊ वस्तू आणि माध्यम क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी झाली. भांडवली वस्तू आणि तंत्रज्ञान निर्देशांकही वधारले. त्याउलट वाहन, ऊर्जा आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्रीचा दबाव राहिला. माहिती-तंत्रज्ञान, धातू, औषधनिर्माण, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि बांधकाम क्षेत्रातील निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. मध्यम आकाराच्या समभागांचा निर्देशांक ०.५३ टक्के, तर लहान आकाराच्या समभागांचा निर्देशांक ०.६९ टक्क्यांनी घसरला.

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.९७ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४९२.१७ लाख कोटी रुपयांवर आले, जे गुरुवारी ४९४.१४ लाख कोटी रुपये होते. प्रमुख समभागांमध्ये अपोलो हॉस्पिटल्स, भारती एअरटेल, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि आयसीआयसीआय बँक हे आघाडीचे वाढणारे समभाग ठरले. दुसरीकडे, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, जिओ फायनान्शियल, एशियन पेंट्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी यांच्या समभागांत घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande